बच्चू कडू यांचा साताऱ्यात अधिकाऱ्यांना इशारा

0
99

सातारा : ‘माझ्या मंत्रालयाशी संबंधित कोणत्याही विभागातील फाईल जर जाणीवपूर्वक थांबवून ठेवली तर त्याची नोकरी थांबली जाईल. नोकरी जाण्यापुरताच विषय मर्यादित राहणार नाही तर त्याला कायद्यानुसार कारवाईलाही सामोरे जावे लागेल,’ असा इशारा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिला.

महिला व बालविकास, शालेय शिक्षण, जलसंपदा, कामगार, इतर मागासवर्ग, सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू शनिवारी सातारा येथे होते. त्यांच्या अखत्यारित असणाऱ्या विभागाचा आढावा त्यांनी घेतल्यानंतर पत्रकारांशी बातचित केली. राज्यमंत्री कडू म्हणाले, ‘शासनाच्या अनेक योजना अजूनही लोकांपर्यंत पोहोचलेल्या नाहीत. पन्नास वर्षांपूर्वी महिला व बालसंगोपन योजना अस्तित्वात आली. मात्र, १0 ते २0 हजार विधवा महिला असताना लाभार्थी महिलांची संख्या तीनशे, चारशे असणे अतिशय दुर्दैवी बाब आहे. त्या अनुषंगाने आम्ही सातारा जिल्ह्यात नवीन योजना लागू केली आहे.’ मी माझ्या त्रासासाठी मंत्री झालेलो नाही, लोकांच्या त्रासासाठी मंत्री झालो,’ असे त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘कायदेशीर कारवाईसाठी मला अडविणारा आजपर्यंत तरी कोणी तयार झालेला नाही. माझ्यावर दबाव आणून मी कोणाचे ऐकणारा नाही. जास्तीत जास्त काय होणार आहे तर माझे मंत्रीपद जाईल, याच्यापलीकडे फार काही होणार नाही. मात्र, लोकांना न्याय देताना मला कोणी अडविण्याचा प्रयत्न केल्यास मी ते कदापी खपवून घेणार नाही.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here