महाआघाडी सरकार गोंधळलेले ! : फडणविसांचा हल्लाबोल

0
138

मुंबई प्रतिनिधी । विद्यमान महाआघाडी सरकार हे आतापर्यंतचे सर्वात गोंधळलेले सरकार असल्याचे नमूद करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज सत्ताधार्‍यांवर जोरदार हल्लाबोल केला.

उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत असून या पार्श्‍वभूमिवर, आज विरोधी पक्षातर्फे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना काहीही मदत मिळालेली नाही. ज्या आमच्या कर्जमाफीला नावे ठेवली, तीच पद्धत यांनी आत्मसात केली. शेतकर्‍यांची मोठी फसवणूक झाली आहे. केवळ पीककर्ज यांनी समाविष्ट केले. त्यामुळे शेडनेट, पशुपालन असे सर्व प्रकारचे कर्ज या नव्या कर्जमाफीत समाविष्ट नाही. कर्जमाफीच्या मुद्यावरून शेतकर्‍यांची फसवणूक सुरू, कर्जमाफी नाही आणि मुक्तीही नाही, जाहीर नाम्यातील एकही आश्‍वासन पूर्ण केलेलं नाही, आतापर्यंत नव्या सरकारला सूर गवसलेला नाही. आतापर्यंतचं हे सर्वात गोंधळलेलं सरकार असल्याची टीका त्यांनी केली.

दरम्यान, विद्यमान सरकारकडून मागील काळातील निर्णय रद्द केले जात असल्यावरूनही फडणवीस यांनी टीका केली. ते म्हणाले की, सर्व चांगल्या कामांना स्थगिती देण्याचा प्रकार वाढला आहे. जलयुक्त शिवार सरकार बंद जरूर करेल, पण जनता ती बंद होऊ देणार नाही. जलयुक्त शिवार असो की वृक्षारोपण आम्ही कोणत्याही प्रकारच्या चौकशीला घाबरत नाही. जाणीवपूर्वक लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे असा आरोप त्यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here