…या तर भाजपच्या उलट्या बोंबा !- सचिन सावंत

0
113

मुंबई प्रतिनिधी । मालेगाव बॉम्बस्फोट, समझोता एक्सप्रेस इत्यादी दहशतवादी हल्ल्यांच्या आरोपींना पाठीशी घालून त्यांना सोडण्याकरता सरकारी वकिलांवर दबाव आणणार्‍या भाजपाकडून २६-११ च्या फेरचौकशीची मागणी करणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याचा हल्लाबोल काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

यासंदर्भात बोलताना सचिन सावंत म्हणाले की, भाजपाने खोटेपणाची हद्द ओलांडली आहे आणि राजकीय संवादाच्या अत्यंत न्यूनत्तम स्तर गाठून विरोधकांची बदनामी करण्याकरीता ते मागेपुढे पाहत नाहीत हे वेळोवेळी स्पष्ट झालेले आहे. निवृत्त पोलीस अधिकारी राकेश मारिया यांच्या पुस्तकात अजमल कसाबच्या आरोपपत्रात नमूद केलेल्या मजकुराशिवाय कोणताही नवीन मजकूर आलेला नाही. अजमल कसाबने आपल्या कबुली जबाबात पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबातर्फे त्यांना हिंदू नावाचे ओळखपत्र आणि हातात बांधायला लाल धागे दिले होते असे सांगितले आहे. याचे कारण एका अतिरेक्याने त्यांना विचारले असता या ओळखपत्र व धाग्यांमुळे पोलिसांना गुंगारा देता येईल असे उत्तर दिले होते. हे कसाबच्या कबुली जबाबात स्पष्टपणे नमूद आहे.
राकेश मारिया यांनी आपल्या पुस्तकात याबाबत असे म्हटले आहे की, जर अजमल कसाब जिवंत सापडला नसता तर माध्यमांनी त्याला हिंदू म्हणून घोषीत केले असते. यामध्ये कुठल्याही तर्‍हेचे कट, कारस्थान वा सरकारचा दबाव होता असा आरोप मारिया यांनी केलेला नाही. ते केवळ माध्यमांबाबत बोलत आहेत याचबरोबर आरोपपत्रात या सगळ्या गोष्टी अगोदरच नमूद असताना आज भाजपाने केवळ राजकीय चिखलफेक करण्याकरिता खोटारडेपणा व हिन दर्जाच्या राजकारणाचा आधार घेतलेला आहे.

सचिन सावंत पुढे म्हणाले की, भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यंमत्र्यांना लिहिलेल्या पत्रात तर खोटारडेपणाचा कळस गाठलेला आहे. काँग्रेस आघाडी सरकारने २६-११ दहशतवादी हल्लाच्या चौकशीसाठी निवृत्त गृहसचिव राम प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली व्दिसदस्यीय कमिटी स्थापन केली होती. २६-११ ला १० वर्षे झाल्याच्या संदर्भात २६ नोव्हेंबर २०१८ रोजी राम प्रधान यांनी हिंदुस्तान टाइम्स वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीचा आधार घेऊन, तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्यावर अत्यंत बेफाम आरोप केलेले आहेत. भातखळकर या पत्रात म्हणतात की राम प्रधान यांनी सदर मुलाखतीत हे मान्य केलेले आहे की, त्या हल्ल्यात जे लोकल कनेक्शन मिळत होते ते तुम्ही उघड करु नका, अशा प्रकारचा आदेश तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री चिदंबरम यांनी आपल्याला दिला होता. सदर मुलाखतीत अशा तर्‍हेचा कोणताही उल्लेख नाही. राम प्रधान यांनी या मुलाखतीत असे म्हटले आहे की, चिदंबरम यांना आमच्या समितीचा रिपोर्ट पहायला पाहिजे होता. यासंदर्भात या रिपोर्टसह आम्ही काही संवेदनशील माहिती वेगळ्या टिप्पणीव्दारे सादर केली पण गृहखात्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि नंतर डेव्हीड हेडली संदर्भातील बातम्या आल्या. केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे राम प्रधान यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन झालेली नव्हती तर ती राज्य सरकारच्या आदेशाने झाली होती. त्यामुळे सदर टिप्पणीची दखल घेतली आहे की नाही हे केंद्रीय गृहमंत्रालयाला राम प्रधान यांना सांगणे बंधनकारक नव्हते. त्याचबरोबर या मुलाखतीमध्ये भातखलकरांच्या सांगण्यानुसार राम प्रधान यांनी त्यांच्यावरती दबाव आणला किंवा सदर कनेक्शन उघड करु नका असे आदेश दिला असा कुठेही उल्लेख नाही. त्यामुळे भाजपाकडून सदरचे पत्र हा कांगावा असून आजवर भारतातील दहशतवादी कृत्यांना पाठीशी घालण्याच्या भाजपाच्या या कृत्यातून सुटका करुन घेण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. काँग्रेस सरकारच्या कालावधीत जगातील पहिला अतिरेकी पोलीस अधिकार्‍यांच्या शौर्याने प्राणाची बाजी लावून जिवंत पकडला गेला आणि भारतीय न्यायव्यवस्थेने आदर्श न्यायप्रक्रिया राबवून त्याला फाशीची शिक्षा दिली. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय न्यायव्यवस्था दहशतवाद्याला स्वतःचे म्हणणे मांडण्याची संधी देवून शासन देऊ शकते ही बाब या देशातील सर्व नागरिकांना अभिमान बाळगणारी आहे. दहशतवादाचे आरोप असलेल्या प्रज्ञा ठाकूरला लोकसभेचे तिकीट देणार्‍या भाजपाने आपल्या हीन राजकारणासाठी २६-११ ची फेरचौकशीची मागणी करुन भारतीय न्यायव्यवस्थेचा ज्या शूरविर पोलीस अधिकार्‍यांनी, सैनिकांनी प्राणाची बाजी लावली त्या शहिदांचा आणि प्रामाणिकपणे चौकशी करुन प्रचंड मेहनतीने कसाबला फाशीपर्यंत पोहचवणार्‍या आपल्या कर्तबगार पोलिस अधिकार्‍यांचा अपमान केला आहे, असे सावंत म्हणाले याबद्दल भाजपा व भातखळकर यांनी माफी मागावी अशी मागणीही सावंत यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here