पुणे : राज्यात मागील पाच वर्षांत पोलीस भरती झालेली नाही. आगामी काही वर्षांत आठ हजार पोलीस शिपाई भरती करण्यात येणार आहे, तसेच महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अंतर्गत सात हजार सुरक्षा रक्षकांची भरती प्रक्रिया मार्च महिन्यात राबवण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
राज्य पोलीस दलात मनुष्यबळाचा अभाव असल्याने सध्या कार्यरत पोलीस यंत्रणेवर कामाचा ताण वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर नवीन मुनष्यबळाची भरती केली जावी, अशी मागणी पोलीस अधिकाऱ्यांकडून गृहविभागाकडे नेहमीच करण्यात येते. दरम्यान, पुणे दौऱ्यावर असलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आठ हजार पोलीस शिपाई पदे लवकरच भरण्यात येतील, अशी माहिती दिली. तसेच लवकरच यासंदर्भात जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असून युवकांना मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध होणार असल्याचेही ते म्हणाले.