यवतमाळ । यवतमाळ जिल्हा काँग्रेस समितीतर्फे पक्षाचे मंत्री आमदार यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्यसभेचे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, सार्वजनीक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, ना. विजय वडेट्टीवार, ना. यशोमती ठाकूर, खासदार बाळासाहेब धानोरकर, माजी खासदार विजय दर्डा आदी मान्यवर उपस्थित होते. या सत्काराला उत्तर देतांना आझाम म्हणाले की, भाजप सरकारने केवळ जाती-पातीचे राजकारण केले. मात्र,दिल्लीच्या जनतेने असे धार्मिक ध्रुवीकरण नाकारले. विशेष म्हणजे, दिल्लीत मुस्लीम लोकसंख्या कमी असून हिंदूच मोठ्या प्रमाणात आहेत. भाजपच्या जातीय राजकारणाला दिल्लीतील हिंदू मतदारांनीही झिडकारले. भाजपच्या काळात देशात २३ लाख उद्योग बंद झाले. महागाई १२.२ टक्के वाढली. वादग्रस्त कायदे करायचे आणि लोकांना विभाजित करून आपसात भांडत ठेवायचे, ही भाजपची नीती असल्याच्या आरोप आझाद यांनी केला. तर माजी खासदार विजय दर्डा म्हणाले, आज काँग्रेसच्या देशातील स्थितीवर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकीत जे आमदार निवडून आले, ते स्वत:च्या बळावर निवडून आले. मात्र, जे हरले, त्यांच्या पराभवाची जबाबदारी पक्षाची आहे. आता सर्व मतभेद बाजूला सारून पक्ष संघटना मजबूत करावी लागणार असल्याचे ते म्हणाले.