हार्दीक पटेल बेपत्ता झाल्याची पत्नीची तक्रार

0
4

अहमदाबाद । काँग्रेसचे नेते हार्दीक पटेल हे बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांची पत्नी किंजल यांनी नोंदवल्याने खळबळ उडाली आहे.

पाटीदार समाजाचे नेते तथा काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल गेल्या २० दिवसांपासून बेपत्ता असल्याचे त्यांच्या पत्नी किंजल पटेल यांनी सांगितले आहे. तसेच गुजरात सरकार हार्दिक पटेल यांना टार्गेट करत असल्याचा आरोपही किंजल यांनी केला आहे. हार्दिक पटेल यांच्यावर २०१५ च्या पाटीदार आरक्षण आंदोलनासंबंधित देशद्रोहाचा खटला सुरु आहे. याप्रकरणी त्यांना १८ जानेवारीला अटकही झाली होती. मात्र अटकेनंतर हार्दिकची कोणतीही माहिती नसल्याचा दावा किंजल यांनी केला आहे. तसेच पोलीसही याबाबत काही माहिती देत नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

पाटीदार आरक्षण नेत्यांच्या वतीने आजोजित केलेल्या कार्यक्रमात किंजल यांनी, हार्दिक पटेल यांना १८ जानेवारीला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची काहीही माहिती नाही. ते सध्या कुठे आहेत याची आम्हाला माहिती नाही. मात्र पोलीस वारंवार येऊन आम्हाला त्यांचा पत्ता विचारत आहे. हार्दिक पटेल यांना टार्गेट करण्यात येत असून भाजपमध्ये गेलेल्या इतर पाटीदार नेत्यांवर अशी कारवाई होत नाही. हार्दिक पटेल यांनी लोकांना भेटावे अशी गुजरात सरकारची इच्छा नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, खटल्यासाठी सातत्याने गैरहजर राहणारे हार्दिक पटेल यांना १८ जानेवारीला अटक करण्यात आली होती. याप्रकरणी हार्दिक पटेल यांची चार दिवसांनंतर जामिनावर सुटका करण्यात आली होती. मात्र पाटन आणि गांधीनगर येथील दोन प्रकरणात त्यांना पुन्हा ताब्यात घेण्यात आले होते. या दोन्ही प्रकरणात २४ जानेवारीला त्यांना जामीन मिळाला होता. न्यायालयाने पुन्हा त्यांना सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र न्यायालयात हजर न झाल्याने त्यांच्याविरोधात पुन्हा अटक वॉरंट जारी करण्यात आले. यानंतर त्यांचा कोणताही पत्ता लागत नसल्याचा दावा त्यांच्या पत्नीने केला आहे. लक्षणीय बाब म्हणजे हार्दिक पटेल बेपत्ता असले तरी सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहेत. आपच्या दिल्लीतील विजयानंतर त्यांनी अरविंद केजरीवाल यांचे ट्विटरवर अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here