सावरकरांबद्दलची मांडणी ऐतिहासिक वस्तुस्थितीला धरुनच-सचिन सावंत

0
43

मुंबई | महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मासिक जनमानसाची शिदोरी मध्ये वि. दा. सावरकर यांच्याबद्दलचा लेख हा ऐतिहासिक वस्तुस्थितीला धरुनच आहे, त्यामुळे शिदोरीचा अंक मागे घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी स्पष्ट केले आहे.

शिदोरी मासिकातील लेखावर टीका करत अंक मागे घेण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती, त्यावर सावंत बोलत होते. महाराष्ट्रातील भाजपाची सत्ता गेल्याच्या दुःखातून फडणवीस व भाजप नेते बोलत असून राजकारणासाठी ते कोणत्याही स्तराला जात असल्याचे वारंवार दिसून आले आहे. शिदोरी मासिकातील अंकात सावरकर यांच्याबद्दलचा लेख हा त्यांचा द्वेष किंवा बदनामी करण्य़ासाठी नाही. सावरकरांबद्दल काँग्रेसला व्यक्तीद्वेष नाही, त्यांच्या विचारांना विरोध आहे. या लेखात ऐतिहासिक सत्यच मांडलेले आहे, त्यातील एक शब्दही वावगा नाही. वस्तुनिष्ठ माहितीवर आधारीत हा लेख आहे. लोकांचे प्रबोधन व्हावे हाच त्यामागचा हेतू आहे. फडणवीसांना इतिहास माहित नसावा, परंतु आपल्या राजकीय स्वार्थासाठी सतत सावरकरांचा विषय पेटवण्याचा उद्योग फडणवीस करत असून महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, त्यात त्यांना यश येणार नाही.

मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढण्याची पद्धत चुकीची होती, त्याची दखल काँग्रेस सरकारने घेऊन तात्काळ चौकशीचे आदेशही दिलेले आहेत. परंतु यावरही फडणवीसांनी राजकीय पोळी भाजायचा प्रयत्न केलेला आहे. भाजपाला शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकारही नाही. ज्यांच्या पक्षात छिंदम आहे. ज्यांच्या आशिर्वादने दिल्लीच्या भाजप मुख्यालयात छत्रपतींची मोदींशी तुलना करणारे पुस्तक प्रकाशित करण्यात आले, शिवाजी महाराजांच्या नावाने फसवी शेतकरी कर्जमाफी योजना देऊन महाराजांचा अपमान केला, शिवस्मारकातही भाजपाने भ्रष्टाचार केला, अशा भाजपाला शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नाही, असेही सावंत म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here