यवतमाळ | विधान परिषदेच्या यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत शुक्रवारी ३१ जानेवारी रोजी शंभर टक्के मतदान पार पडले. प्रा. तानाजी सावंत विधानसभेवर निवडून गेल्याने यवतमाळची जागा रिक्त झाली होती. त्यासाठी ही पोटनिवडणूक घेण्यात आली.
जिल्ह्यातील सात केंद्रांवर सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळात मतदान प्रक्रिया पार पडली असून सर्व ठिकाणी शंभर टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. एकूण ४८९ मतदार आहेत. त्यामध्ये २४५ पुरुष तर २४४ महिला मतदारांचा समावेश आहे. यवतमाळातील बचत भवनात ४ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. चतुर्वेदी बाजी मारतात की बाजोरिया याचा फैसला ४ फेब्रुवारीच्या मतमोजणीनंतरच होणार आहे. विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यात सट्टाबाजारही तेजीत होता.