निरीक्षणगृहाच्या नवीन इमारतीचे यशोमती ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

0
80

मुंबई – दी चिल्ड्रेन्स एड् सोसायटी संचलित उमरखाडी, डोंगरी येथील बाल निरीक्षणगृहाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार अमिन पटेल तसेच महिला व बाल विकास विभागाच्या सचिव श्रीमती आय. ए. कुंदन यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्रीमती ठाकूर म्हणाल्या, येथे भरती होणाऱ्या बालकांना भविष्यातील चांगला माणूस घडविण्याचे काम व्हावे. संस्कारक्षम वयात चांगले संस्कार झाल्यास त्यांची उत्तम सामाजिक जडणघडण घडून येईल. निरीक्षणगृहाची इमारत चांगली असून स्वच्छता, बालकांचे आरोग्य, शैक्षणिक विकास याची विशेष काळजी घेण्यात यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.

उमरखाडी येथे कार्यरत असलेल्या या निरीक्षण गृहातील इमारत जुनाट झाल्याने नवीन बालस्नेही इमारत बांधण्यात आली आहे. राज्य शासनाच्या शंभर टक्के अनुदानातून निरीक्षणगृह चालविण्यात येते. हरवलेली बालके, गुन्ह्यातील बालकांना या ठिकाणी शैक्षणिक विकासासाठी भरती करण्यात येते. बालकांच्या शिक्षणाबरोबरच आरोग्य सुविधा, सामाजिक, मानसिक विकासासाठी उपक्रम या ठिकाणी राबविण्यात येतात.

या उद्घाटनप्रसंगी महिला व बालविकास विभागाच्या उपसचिव स्म‍िता निवतकर, अवर सचिव रवी जरांडे, कोकण विभागाचे महिला व बाल विकास उपायुक्त राहूल मुळे, मुंबई शहर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी प्रविण भावसार, चिल्ड्रेन्स एड् सोसायटीचे मुख्य अधिकारी विजय क्षीरसागर आदी यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here