चंद्रपूर | ओबीसी महामंडळाला निधी कमी पडू देणार नाही,अशी ग्वाही ओबीसी, खार, जमीन, मदत व पूनर्वसन मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. राष्ट्रीय ओबीसी महासंघ आयोजित अधिवेशनात ते बोलत होते.
यावेळी विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले व अधिवेशनाचे अध्यक्ष डॉ. बबन तायवाडे, उद्घाटक इंदरजीत सिंग व प्रमुख मार्गदर्शक निवृत्त न्यायमूर्ती तसेच राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे माजी अध्यक्ष व्ही. ईश्वरय्या, प्रसिद्ध विचारवंत प्रा. सुशिला मोराळे आदी उपस्थित होते.
विजय वडेट्टीवार म्हणाले, ओबीसी महामंडळाला जादा निधी मिळावा, यासाठी प्रयत्न सुरू आहे. यातून विकासाच्या अनेक योजना राबविण्यात येणार आहे. ओबीसी समाजाला नॉनक्रिमीलेअरची अट घालून मोठे नुकसान करण्यात आले. स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या ४२ उमेदवारांना अद्याप अधिकारी पदावर रूजू होता आले नाही. केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे हा अन्याय झाला. हा अन्याय दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेवून पाठपुरावा केला आहे असेही त्यांनी सांगितले.