चांदूर बाजार बच्चू कडू यांनी जनतेच्या तक्रारी सोडविण्यासाठी आपल्या गावात ३० जानेवारी ते ८ फेब्रुवारीपर्यंत राहुटीचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
चांदूर बाजार तालुक्यातील ६ जि.प. व १२ पं.स. सर्कलमधील १०२ गावातील नागरिकांकडून त्यांच्या विविध विभागाच्या तक्रारी २६ जानेवारीपर्यंत प्रत्येक गावातील प्रहारच्या पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यांकडे द्यावयाच्या आहेत. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह राज्यमंत्र्यांनी उपलब्ध करून दिलेला ‘फॉर्म’ भरणे आवश्यक आहे. सर्वच गावात हे फॉर्म विनामूल्य वितरित करण्यात आले आहे. २६ जानेवारीनंतर सदर फॉर्म राज्यमंत्र्यांकडे चाचपणीसाठी गेल्यानंतर ३० जानेवारीपासून सुरू होणाऱ्या राहुटी उपक्रमात या समस्यांचा निपटारा करण्यात येईल.
या उपक्रमात महसूल, तलाठी, कृषी विभाग, जलसिंचन, दुय्यम निबंधक, नोंदणी विभाग, पंचायत समिती, शिक्षण, आरोग्य, घरकुल, रेशनकार्ड, एसटी पासेस, आदिवासी विभाग, सार्वजनिक बांधकाम, महावितरण, पाटबंधारे, ग्रामीण पाणीपुरवठा, भूमिअभिलेख, समाजकल्याण, मृदजलसंधारण, वनविभाग, बालविकास, परिवहन मंडळ, लघुसिंचन आदी विभागाचे अधिकारी राज्यमंत्री बच्चू कडूंसोबत प्रत्येक गावात उपस्थित राहून जनतेच्या तक्रारींचा जागेवरच निपटारा करणार आहेत.