मुंबई | आमचा रंग भगवाच आहे आणि अंतरंगही भगवेच आहे, अशी ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बीकेसी मैदानावर आयोजित वचनपूर्ती सोहळ्यात दिली.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९४व्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्यावतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर काम केलेल्या अकरा ज्येष्ठ शिवसैनिकांच्या हस्ते आणि हजारो शिवसैनिकांच्या साक्षीने उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि पुत्र तसेच राज्याचे पर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचा या वेळी भावपूर्ण सत्कार करण्यात आला. तसेच मुंबईतील शिवसेनेच्या सर्व विभागप्रमुखांनीही ठाकरे यांचा सत्कार केला.
उद्धव ठाकरे यांनी सत्काराला उत्तर देताना भाजपचा जोरदार समाचार घेतला.ण हिंदुत्ववादी शिवसेनेचा हात २०१४मध्ये सोडून जाणाऱ्यांनी तेव्हा सरकार स्थापन करताना अदृश्य हातांची मदत घेतली होती, आज तेच आमच्यावर खरा चेहरा उघडा पडल्याची टीका करीत आहेत. तुम्ही तर असे वागलात की अख्खे उघडे पडलात, या शब्दात ठाकरे यांनी भाजपला सुनावले. माझे मुख्यमंत्रिपद मी शिवसेनेसाठी खस्ता खाल्लेले, घाम गाळलेले आणि प्रसंगी रक्त सांडलेल्या शिवसैनिकांच्या चरणी समर्पित करीत आहे. हजारो शिवसैनिक हेच बाळासाहेबांचे सुरक्षाकवच होते आणि माझेदेखील आहेत. घरचे व बाहेरचे कोणीही विरोधक तलवार, चाकू, सुºया काहीही घेऊन घात करण्यासाठी आले तर हेच सुरक्षाकवच माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे असेल, असे उद्गार त्यांनी काढले.