चंद्रकांत पाटील म्हणजे भाजपचे ‘दादामियां’ ! – शिवसेनेची टीका

0
185

मुंबई प्रतिनिधी । चंद्रकांत पाटील हे भाजपचे ‘दादामियां’ असल्याचे नमूद करत शिवसेनेने त्यांनी संभाजीनगरावरून केलेल्या वक्तव्याचा जोरदार समाचार घेतला आहे.

माजी महसूलमंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कालच औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर झाले पाहिजे असे वक्तव्य केले होते. याचा शिवसेनेचे मुखपत्र असणार्‍या सामनातील संपादकीयमधून समाचार घेण्यात आला आहे. यात म्हटले आहे की, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील वगैरे राज्यातील मंडळी सध्या जे बोलतात आणि करतात त्यात त्यांचे वैफल्यच दिसून येते. चंद्रकांत पाटील म्हणजे भाजपचे दादामियां हेसुद्धा आता फडणवीसांच्या पावलावर पाऊल टाकून नको तिथे जीभ टाळयास लावीत आहेत. आता त्यांनी संभाजीनगरात जाऊन अशी आपटली आहे की, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचे आम्ही वंशज आहोत, औरंगजेबाचे नाही. त्यामुळे औरंगाबादचे नामकरण झालेच पाहिजे. भाजपच्या दादामियांचा आवेश आणि जोर पाहता या मंडळींची फक्त जीभच सटकली आहे असे नाही, तर बरेच काही सटकले आहे हे नक्की. त्यांचे म्हणणे असे की, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचे आम्ही वंशज आहोत. दादामियांनी हे स्वतःच जाहीर करण्याचे कारण नाही.

अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, पाच वर्षे महाराष्ट्रात तुमचेच सरकार होते, केंद्रातही तुम्हीच आहात. मग पाच वर्षांत औरंगाबादचे संभाजीनगर का करू शकला नाहीत? तिकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पहिल्या झटक्यात वाराणसीचे प्रयागराज केले. इतरही नावे-गावे बदलली. त्यांना कोणीच अडवले नाही. मग श्री. फडणवीस यांना औरंगाबादचे संभाजीनगर करायला कोणाची परवानगी हवी होती? हिंदूंचा स्वाभिमान हा प्रखर राष्ट्रवादाशी जोडला गेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रवाद कदापि मार खाणार नाही. जो राष्ट्रवाद मारण्याचा प्रयत्न करील तो हिंदूंच्याच हातून मार खाईल. कारण आम्ही सगळेच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे व हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वंशज आहोत. महाराष्ट्रात भाजपचे घोडे हे अजूनही मोगलांप्रमाणे सरळ पाणी प्यायला तयार नाहीत. विरोधी पक्ष म्हणजे फक्त लाथा झाडायला आणि हवे तसे बेताल बोलायलाच उरला आहे काय? असा प्रश्‍न लोकांना पडत आहे. आम्हाला महाराष्ट्रात शांतता हवी आहे. दादामियांसारख्या लोकांनी औरंग्याची पिशाचे कितीही उकरून काढली तरी महाराष्ट्राची शांतता भंग पावणार नाही हे दादामियांनी पक्के लक्षात ठेवावे. असे अनेक दादामियां गोधडया भिजवत होते तेव्हा शिवसेना हिंदुत्व आणि राष्ट्रकार्यासाठी छातीचा कोट करून लढत होती. दादामियां, हे ध्यानात ठेवा असा इशारा यात देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here