Home Blog

नारायण राणेंची उध्दव ठाकरेंवर टीका

0

पुणे प्रतिनिधी । मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे अनुभवशुन्य असून त्यांच्या कारकिर्दीमुळे राज्य अधोगतीला जाईल असे सांगत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

पुण्यात सॅटरडे क्लबच्या कार्यक्रमात खासदार नारायण राणे यांच्यासह खासदार श्रीनिवास पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी महापौर अंकुश काकडे, निवेदक सुधीर गाडगीळ तसेच विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होते. यावेळी निवेदक सुधीर गाडगीळ यांच्याशी संवाद साधतांना नारायण राणे यांनी नाईट लाईफ बद्दल आपली भुमिका मांडली. ते म्हणाले की, मुंबईकरांनी कधीही नाईट लाईफ मागणी केली नव्हती. मात्र, मुख्यंमत्र्यांकडून चिरंजीवांच्या हट्टापायी हा निर्णय घेण्यात आला आहे. हा हट्ट पुरवण्याऐवजी त्यांनी राज्यातील इतर प्रश्‍न सोडवावेत, असा सल्ला देखील त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना दिला. उद्धव ठाकरे कधी मुख्यमंत्री होतील, असे वाटले नव्हते. कारण त्यांना मुख्यमंत्रीपदाची कधीही महत्वकांक्षा नव्हती. त्यांना प्रशासकीय बाबींची काहीही माहिती नाही. ते एक अनुभव शून्य व्यक्ती आहेत, त्यामुळे राज्य अधोगतीकडे जाईल, अशा शब्दांत भाजपा नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

पंतप्रधान मोदींची शहिदांना श्रध्दांजली

0

नवी दिल्ली वृत्तसंस्था । प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय युध्द स्मारकात शहिदांना श्रध्दांजली अर्पण केली.
यंदा प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला ब्राझीलचे राष्ट्रपती जायेर बोलसोनारो हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. तर राजपथावर पथसंचलनदेखील सुरू करण्यात आले आहे. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय युध्द स्मारकात शहिदांना श्रध्दांजली अर्पण केली. पंतप्रधानांनी आजवरची परंपरा मोडीत काढून पहिल्यांदा राष्ट्रीय युध्द स्मारकाला भेट दिली. याप्रसंगी त्यांच्या सोबत तिन्ही दलांचे प्रमुख आणि चीफ ऑफ आर्मी स्टॉप आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

अदनान सामीला पद्मश्री देण्यास मनसेचा विरोध

0

मुंबई | अदनान सामीला पद्मश्री पुरस्कार देण्याच्या निर्णयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध दर्शविला आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारच्यावतीनं पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यावेळी कला क्षेत्रातून ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर यांच्यासह गायक अदनान सामीला देखील पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मात्र, सामीला पद्मश्री पुरस्कार देण्याच्या निर्णयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध दर्शविला आहे.

मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. सुरेश वाडकर यांना पद्मश्री मिळाल्याचा आनंद साजरा करतोय, तोच आनंदावर थोडं विरजण पडलं अदनान सामीला दिलेल्या पद्मश्रीमुळे असं अमेय खोपकर यांनी म्हटलं आहे. याशिवाय, 2015 मध्ये म्हणजे मोदींच्याच काळात त्याला भारतीय नागरिकत्व मिळालं आणि लगेच चार वर्षात त्याला पद्मश्रीही बहाल केला. त्याला एवढं ‘लिफ्ट’ करण्याचं कारण काय? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे. मूळ भारतीय नागरिक नसलेल्या अदनान सामीला भारत सरकारने कोणताही पुरस्कार देऊ नये. हे मनसेचं ठाम मत आहे. त्यामुळे त्याला बहाल केलेल्या पद्मश्री पुरस्काराचा मनसेकडून तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. अदनान सामीला जाहीर झालेला पद्म पुरस्कार त्वरित रद्द करण्यात यावा, अशी मागणीही अमेय खोपकर यांनी केली आहे.

ओबीसी महामंडळाला निधी कमी पडू देणार नाही- वडेट्टीवार

0

चंद्रपूर | ओबीसी महामंडळाला निधी कमी पडू देणार नाही,अशी ग्वाही ओबीसी, खार, जमीन, मदत व पूनर्वसन मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. राष्ट्रीय ओबीसी महासंघ आयोजित अधिवेशनात ते बोलत होते.

यावेळी विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले व अधिवेशनाचे अध्यक्ष डॉ. बबन तायवाडे, उद्घाटक इंदरजीत सिंग व प्रमुख मार्गदर्शक निवृत्त न्यायमूर्ती तसेच राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे माजी अध्यक्ष व्ही. ईश्वरय्या, प्रसिद्ध विचारवंत प्रा. सुशिला मोराळे आदी उपस्थित होते.

विजय वडेट्टीवार म्हणाले, ओबीसी महामंडळाला जादा निधी मिळावा, यासाठी प्रयत्न सुरू आहे. यातून विकासाच्या अनेक योजना राबविण्यात येणार आहे. ओबीसी समाजाला नॉनक्रिमीलेअरची अट घालून मोठे नुकसान करण्यात आले. स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या ४२ उमेदवारांना अद्याप अधिकारी पदावर रूजू होता आले नाही. केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे हा अन्याय झाला. हा अन्याय दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेवून पाठपुरावा केला आहे असेही त्यांनी सांगितले.

प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा

0

मुंबई | भारतीय प्रजासत्ताकाच्या 70 व्या वर्धापनदिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात, सर्वाना एकत्र घेऊन जाण्याच्या भावनेतून राज्याच्या विकासासाठी काम करण्याची खरी आवश्यकता आहे. महाराष्ट्र हे नेहमीच एक प्रगतीशील राज्य म्हणून ओळखले जाते. या राज्याचा कणा असलेला शेतकरी, कामगार आणि तळागाळातील जनता यांना सन्मान आणि प्रतिष्ठा देणे महत्वाचे आहे, यादृष्टीने आम्ही काही ठोस पाऊले जाणीवपूर्वक उचलली आहेत मग ती गरिबांना केवळ 10 रुपयांत दरात अन्न देणारी शिवभोजन योजना असो किंवा शेतकऱ्यांना चिंतामुक्त करणारी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना असो. महाराष्ट्राला विकासाच्या मार्गावर नेतांना आम्हाला जसे उद्योगपती, व्यावसायिक आवश्यक आहेत तसे कष्टकरी समाजातील लोकांचे योगदानही महत्वाचे आहे.

महाराष्ट्र मोठा झाला तर देश मोठा होईल हे लक्षात घेऊन आपण सर्वजण या प्रजासत्ताक दिनापासून नवा आणि कणखर महाराष्ट्र घडवूयात, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

ना.बच्चू कडूंचा ‘राहुटी’ उपक्रम

0

चांदूर बाजार बच्चू कडू यांनी जनतेच्या तक्रारी सोडविण्यासाठी आपल्या गावात ३० जानेवारी ते ८ फेब्रुवारीपर्यंत राहुटीचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

चांदूर बाजार तालुक्यातील ६ जि.प. व १२ पं.स. सर्कलमधील १०२ गावातील नागरिकांकडून त्यांच्या विविध विभागाच्या तक्रारी २६ जानेवारीपर्यंत प्रत्येक गावातील प्रहारच्या पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यांकडे द्यावयाच्या आहेत. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह राज्यमंत्र्यांनी उपलब्ध करून दिलेला ‘फॉर्म’ भरणे आवश्यक आहे. सर्वच गावात हे फॉर्म विनामूल्य वितरित करण्यात आले आहे. २६ जानेवारीनंतर सदर फॉर्म राज्यमंत्र्यांकडे चाचपणीसाठी गेल्यानंतर ३० जानेवारीपासून सुरू होणाऱ्या राहुटी उपक्रमात या समस्यांचा निपटारा करण्यात येईल.

या उपक्रमात महसूल, तलाठी, कृषी विभाग, जलसिंचन, दुय्यम निबंधक, नोंदणी विभाग, पंचायत समिती, शिक्षण, आरोग्य, घरकुल, रेशनकार्ड, एसटी पासेस, आदिवासी विभाग, सार्वजनिक बांधकाम, महावितरण, पाटबंधारे, ग्रामीण पाणीपुरवठा, भूमिअभिलेख, समाजकल्याण, मृदजलसंधारण, वनविभाग, बालविकास, परिवहन मंडळ, लघुसिंचन आदी विभागाचे अधिकारी राज्यमंत्री बच्चू कडूंसोबत प्रत्येक गावात उपस्थित राहून जनतेच्या तक्रारींचा जागेवरच निपटारा करणार आहेत.

राज ठाकरे यांच्या भूमिका बदलाचे अमृता फडणवीसांनी केले स्वागत

0

मुंबई प्रतिनिधी । मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अलीकडेच आपल्या पक्षाच्या झेंड्यात बदल करून आपली भूमिकादेखील बदलण्याचे संकेत दिले असून या बदलाचे अमृता फडणवीस यांनी स्वागत केले आहे.

मनसेच्या पहिल्या अधिवेशनात पक्षाच्या बहुरंगी झेंड्याच्या जागी छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा असणारा ध्वजाचं अनावरण करण्यात आले. याप्रसंगी राज ठाकरे यांनी केेल्या भाषणातून मनसे आगामी काळात हिंदुत्वाच्या मार्गाने वाटचाल करणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. या पार्श्‍वभूमिवर, अमृता फडणवीस यांनी या बदलाचे स्वागत केले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अमृता फडणवीस म्हणाल्या की, राज ठाकरे यांनी पक्षासाठी आता नवीन दिशा ठरवली आहे. त्यामुळे ते आता चांगल्या प्रकारे काम करतील.

तर भाजप मेहबुबा मुफ्तींसोबत अयोध्येला नेणार का? : राऊत

0

मुंबई प्रतिनिधी । भाजप मेहबूबा मुफ्तींना अयोध्येला नेणार आहे का ? असा टोला मारत खासदार संजय राऊत यांनी आज जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

महाविकासआघाडी सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्यानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ७ मार्च रोजी अयोध्या दौर्‍यावर करणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. यावर उद्धव ठाकरे काँग्रेस नेते राहुल गांधींना आपल्यासोबत नेतील का? असा खोचक प्रश्‍न भाजपने विचारला आहे. यावर उत्तर देताना संजय राऊत यांनी म्हणाले कि, मग भाजप नेते जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांना अयोध्येला सोबत घेऊन जाणारे आहेत का?, असा प्रतिप्रश्‍न त्यांनी भाजपला केला. अयोध्या दौर्‍याकडे कोणीही राजकीय दृष्टिकोनातून पाहू नये. हा आमचा श्रद्धेचा विषय असल्याचेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

सत्य बाहेर येण्याच्या भितीनेच एनआयएतर्फे तपास : शरद पवार

0

मुंबई प्रतिनिधी । भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषद प्रकरणातील सत्य बाहेर येईल या भीतीपोटी केंद्र सरकारने या प्रकरणांचा तपास एनआयएकडे सोपवला असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.

केंद्र सरकारने भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषद प्रकरणांचा तपास एनआयएतर्फे करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर शरद पवार यांनी टीका केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी केलेल्या कारवाईची फेरतपासणी होणे गरजेचे आहे असे पवार म्हणाले. कायदा आणि सुव्यवस्था राखणे हा राज्याचा अधिकार आहेत. राज्य सरकार या प्रकरणाची खोलात जाऊन चौकशी करणार होते असेही पवार म्हणाले. ज्या अधिकार्‍यांनी खोटे गुन्हे दाखल करून निरपराध्यांविरोधात खटले दाखल केले त्याबाबतचे सत्य उघड होऊ नये यासाठीच केंद्र सरकारने हे प्रकरण आपल्या हाती घेतले असे आपल्याला वाटते असे पवार म्हणाले.

आपण राज्य सरकारला चौकशीची मागणी करणारे पत्र पाठवल्यानंतर गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. या बैठकीनंतर केंद्र सरकारने घाईघाईने हा तपास राज्य सरकारच्या हातातून काढून तो स्वत:कडे घेतला असे सांगत सरकारने असे घाईघाईत का केले असा प्रश्‍नदेखील पवार यांनी उपस्थित केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष प्रतोदपदी आ. अनिल पाटील

0

अमळनेर प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विधिमंडळ प्रतोदपदी आमदार अनिल भाईदास पाटील यांची नियुक्ती नुकतीच करण्यात आली आहे.

याआधी नवाब मलिक हे राष्ट्रवादीचे पक्ष प्रतोद म्हणून कार्यरत होते त्यांची मंत्रिपदी बढती झाल्याने या पदावर अनिल पाटलांची वर्णी लागली आहे. घटनात्मक रचनेनुसार विधिमंडळात पक्षाचे गटनेते, मुख्य प्रतोद आणि प्रतोद ही तीन महत्वपूर्ण पदे असतात. प्रतोदपदी क्रियाशील आमदारास संधी दिली जात असते, राष्ट्रवादीचे मुख्य प्रतोद आमदार अशोक पवार असून प्रतोद पदी अनिल पाटलांची वर्णी लागली आहे.